मुंबई
शीव-पनवेल महामार्गावर बेलापूर जवळ धावत्या दुचाकीवर तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणी आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर जेवण करून रात्री उशिरा फेरफटका मारण्यासाठी गेली होती.
यावेळी तीन मैत्रिणी मिळून एका दुचाकीवर बेलापूर ते खारघर फेरफटका मारण्यासाठी निघाल्या होत्या. तेव्हा अनोळखी दुचाकीस्वारांनी एका तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित तरुणीने सिबिडी बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सिसिटीव्हीच्या माध्यमातून अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे.बेलापूरमधील सेक्टर १९ मध्ये राहणारी २६ वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणींसोबत रात्री उशिरा फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर गेली होती. प्रवासादरम्यान एका केटीएम दुचाकीवर दोन तरुणांनी या तरुणींचा पाठलाग केला.
या तरुणीच्या मांडीला व खांद्याला स्पर्श केल्याचे तरुणीने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे.तसेच हे तरुण एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तरुणींसोबत असणाऱ्या मित्राला दगड मारल्याचे या तरुणींनी पोलिसांना सांगितले आहे.
पोलीस उपनिरिक्षक विष्णू डुबल हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. संबंधित तरुणींनी पोलिसांत धाव घेत संपूर्ण घटनेची माहिती दिली. संशयीत आरोपी असलेल्या अनोळखी केटीएम दुचाकीस्वारांना शोधण्यास पोलीसांनी सुरुवात केली आहे.