पुरंदर
बेलसर-उरुळी कांचन रस्ता मागील अनेक वर्षांपासून वादाचा मुद्दा ठरत आहे. त्यातच शुक्रवार (दि.9) रोजी रात्री 1वा.15 मि. दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या डंपरने बेलसर मधील नजीम मुजावर व सादिक मुजावर यांच्या ब्युटी पार्लर आणि चिकन सेंटरवर धडक देऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बेलसर येथील नजीर अमीर मुजावर (रा.बेलसर) यांच्या सानिया ब्युटी पार्लर अँड बँगल स्टोअर,जनरल स्टोअर्स तसेच सादिक बाषु मुजावर यांच्या बिस्मिल्लाह चिकन सेंटर वर मध्यरात्रीच्या सुमारास बेधुंद डंपर चालक भरधाव वेगाने वळण न बसल्याने थेट दोन्ही दुकानात जाऊन शिरला आणि अगदी कमी वेळात म्हणजे जवळपास पंधरा ते वीस सेकंदात त्याने तेथून गाडी रिव्हर्स घेऊन पळ काढला आहे. बसलेली धडक हे अत्यंत भयानक होती विजेच्या तारा तुटून त्याच्या ठिणग्या जमिनीवर पडल्या होत्या.
मागील अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेला तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष असलेला बेलसर उरळीकांचन रस्ता अनेक अपघातांसाठी प्रसिद्ध आहे.मागील अनेक वर्षांपासून गावकऱ्यांचे आंदोलने, वाहनांचे अपघात अनुभवलेला रस्ता म्हणून या रस्त्याची ओळख आहे. तसेच राजकीय नेतेमंडळी आणि बांधकाम विभागाकडून अनेक आश्वासनाच्या पोळ्या भाजून त्या तशाच हवेत तरंगत ठेवण्यासाठी हा रस्ता प्रसिद्ध मानला जातो.
बेलसर उरळीकांचन रस्ता हा अनेक वर्षांपासून रखडलेला रस्ता आहे. परंतु अलीकडील काळामध्ये रस्ता तात्पुर्ता पुर्ण झाला आहे. परंतु त्यावर एकच लेअर डांबरीकरण करण्यात आले आहे. अद्याप दुसरे डांबरीकरण करण्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी रस्ता चांगला झाल्याच्या समजामुळे अनेक वाहन चालक भरधाव वेगाने या रस्त्यावर वाहने चालवत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ झाली आहे.
रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाळू, खडी, मुरूम तसेच इतर मालवाहतूक करणारे डंपर आणि ट्रक मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर धावत असतात. त्यासोबतच पेट्रोल वाहतूक करणारेही ट्रक मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर धावत असतात. परंतु त्यावर कुठलीही वेगाची मर्यादा नसते त्यामुळे अपघात होत आहेत.
बेलसर मधील सानिया ब्युटी पार्लरचे एकूण अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाले आहेत. तर बिस्मिल्ला चिकन सेंटर यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती दुकानाचे मालक देतात, तर नजीम मुजावर यांच्या दुकानात स्टेशनरी, कटलरी, बांगड्या, शालेय उपयोगी साहित्य, ब्युटी पार्लर चे साहित्य अशा विविध साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सादिक मुजावर यांच्या दुकानांमध्ये केलेले फर्निचर तसेच पीओपी यांचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
बेलसर उरुळी कांचन रस्ता नुकताच पूर्ण झाल्याने रस्त्यावर भरधाव वेगाने गाड्या धावत आहेत. तर ग्रामस्थांकडून महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बणविण्याची मागणी करण्यात येत आहे.
झालेला अपघात हा बालसिद्धनाथ विद्यालय बेलसर पासून अगदी नजीक झाला आहे. दिवसा या भागात बहुसंख्य शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यामुळे बेलसर येथे साई कृपा कॉम्प्लेक्स समोर तसेच आंबेडकर पुतळ्यासमोर व बालसिद्धनाथ शाळे च्या पाठीमागे स्पीड ब्रेकर टाकण्याची विनंती ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
15 सेकंदाचा थरार
15 सेकंदात डंपर चालकाने केलेल्या चालाकीमुळे डंपर चाल पसार झाला आहे. त्वरित रिव्हर्स गिअर टाकून डंपर चालक डंपर घेऊन पळून गेला. तर डंपर मध्ये नक्की काय होते? तो लगेच पळून का गेला? तर डंपरमध्ये इतर काही साहित्य होते का? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगत आहे.