सांगली
सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर त्यांचा लहान भाऊ थोडक्यात बचावला आहे. रेणुका ऐवळे (वय 7) आणि लक्ष्मी ऐवळे (वय 11) असं मृतक बहिणींचं नाव आहे. तर मायाप्पा ऐवळे (वय 6) असं बचावलेल्या भावाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ऐवळे कुटुंबीय हे काही दिवसांपासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात राहातात. ऐवळे कुटुंब मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतो. या दरम्यान आज सकाळी घरातील सर्व लोक दुसऱ्याच्या शेतात कामासाठी गेले होते. घरात दोन मुली आणि एक मुलगा होता.
दुपारी आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहीणी आणि एक भाऊ असे तिघे मिळून वडापात्रात आंघोळी करण्यासाठी गेले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्याचवेळी त्यांच्यासोबत पोहण्यासाठी गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे याला पाण्यात बुडताना ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने या युवकाने पाहीले. त्याने तात्काळ उडी घेत त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.