तुळजाभवानीमातेच्या मंदिरातील खजिन्यावर डल्ला, व्यवस्थापक अखेर जेरबंद

तुळजाभवानीमातेच्या मंदिरातील खजिन्यावर डल्ला, व्यवस्थापक अखेर जेरबंद

उस्मानाबाद

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे. तुळजाभवानी मातेचा जामदारखाना व खजिन्यातील अतिप्राचीन ऐतिहासिक पुरातन मौल्यवान सोन्या-चांदीचे मौल्यवान अलंकार व नाणी गायबप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता.

दिलीप नाईकवाडी याला तब्बल एक वर्षानंतर त्याच्या घरातूनच अटक करण्यात आली. त्याला २६ सप्टेंबरपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आणखी काहींना लवकरच अटक होण्याची शक्यता तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक अंजुम शेख यांनी व्यक्त केली.

श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 348.661 ग्रॅम सोने व सुमारे 71698.274 ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच 71 प्राचीन नाणे यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सोन्या-चांदीचे पुरातन मौल्यवान अलंकार व नाणी गायब झाल्याप्रकरणी नाईकवाडीविरोधात १३ सप्टेंबर २०२० रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईकवाडी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक म्हणून असताना २९ नोव्हेंबर २००१ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले होते. मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाईकवाडीविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *