जरांगे पाटील यांच्या सभेला विरोध!शिवतीर्थावर सभा घेतली तर गंभीर परिणाम होतील;मनोज जरांगे पाटलांना दिला इशारा

जरांगे पाटील यांच्या सभेला विरोध!शिवतीर्थावर सभा घेतली तर गंभीर परिणाम होतील;मनोज जरांगे पाटलांना दिला इशारा

पुणे

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यभरात दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी जरांगे पश्चिम महाराष्ट्रात जनजागृती करणार असून कराड, सातारा, मेढा या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या सभेसाठी मराठा समाजांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या सातारा येथील शिवतीर्थावरील सभेला मराठा आंदोलक तेजस्वी ताई चव्हाण यांनी विरोध केला आहे. 

सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या पोवई नाक्यावरील शिवतीर्थ परिसरात मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. या सभेला तेजस्वी ताई चव्हाण यांनी विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या परिसरात आम्ही सभा घेऊ देणार नाही, असं तेजस्वी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

जरांगे यांनी येथे सभा घेतली, तर त्यांना गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल, असा इशाराही तेजस्वी ताई चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. कुणबी प्रमाणपत्राला आमचा विरोध आहे. सरकारने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्याव, असं तेजस्वी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन देखील केले होते. आता त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला विरोध केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, धाराशिवमधील सभेनंतर जरांगे यांनी बुधवारी रात्री उशीरा करमाळा येथील मराठा बांधवांना देखील संबोधित केलं.

यावेळी त्यांनी ७० वर्षांची मराठा समाजाची सल बोलून दाखवली. राज्य सरकारने मराठा समाजाला २४ डिसेंबरच्या आत आरक्षण जाहीर करावे अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी करमाळ्याच्या सभेत दिला. माझ्या जीवात जीव असे पर्यंत मी समाजासाठी लढत राहणार आहे.आरक्षण घेतल्याशिवाय मी एक इंच पण मागे हटणार नाही, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *