पुणे
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नारी शक्तीचं रौद्ररुप बघायला मिळालं. महिलांचा हा अवतार मेहकर तालुक्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पाहायाला मिळाला. अश्लील शिवीगाळ आणि एक लाख रुपये मागणाऱ्याला महिला उपसरपंच आणि महिला सदस्यानं मजबूत चोप दिला.
इतका चोप दिला त्याला जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढावा लागलायाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रौद्ररुप धारण करणाऱ्या महिलांचं नाव मंगला निकम आणि अनिता काळे, असं आहे. यातील मंगला निकम ह्या भालेगाव येथील उपसरपंच आहेत. तर अनिता काळे ह्या ग्रामपंचायत सदस्या आहेत.
या दोघांनी संतोष चांदणे नावाच्या व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात चोप दिला.संतोष चांदणे याने भालेगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांविरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केलीय. उपसरपंच मंगला निकम आणि सदस्या अनिता काळे यांचीही त्याने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार संतोष चांदणे याचा हा गोरखधंदा आहे. ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींची आरोप करायचा आणि ती तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्याकडून पैसे उकाळण्याचं काम संतोष करायचा. निकम आणि काळे यांनाही त्याने तक्रार मागे घेण्यासाठी ऑफर दिली होती. तक्रार मागे घ्यायची असेल तर रुपये १ लाख रुपये द्या, अशी मागणी तो त्यांच्याकडे करत होता.
या दोघांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं त्याने या दोघांना शिवीगाळ केली. त्यामुळे महिलांना राग अनावर झाला. मग या दोघांनी संतोष चांदणेला चपलेने मारहाण करत त्याला दिवसाच चांदण्या दाखवल्या.
या मारहाणीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. दरम्यान शासनाकडून काही कारवाई करण्यात येते का? संबंधित व्यक्तीकडून अशाप्रकारे किती जणांना फसवण्यात आलं याची चौकशी केली जाणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.