पुरंदर
सासवड पोलीस स्टेशन येथे हजर राहून फिर्यादी जबाब देतो की, मी वरील पत्त्यावर माझी आई बहीण अनिता लहान भाऊ असे राहतो. मी मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या मार्केटमध्ये कांदे भरण्याचे काम रोज मजुरीने करतो. माझी आई सुद्धा माझ्यासोबतच काम करते. माझी बहीण अनिता ही सोसायटीमध्ये जाऊन धुणी भांड्याचे काम करते. पाच वर्षांपूर्वी माझी बहीण अनिता हिचे लग्न महेश पंडीत बनकर राहणार माळशिरस, तालुका पुरंदर याचे सोबत झाले आहे. तिला एक मोठी मुलगी चार वर्षाची व लहान मुलगा दीड वर्षाचा आहे. माझे दाजी महेश बनकर हे मार्केट यार्ड मध्ये दिवाणजी म्हणून काम करतात. सुरुवातीला चार वर्षे माझ्या बहिणीला व्यवस्थित नांदवले.
त्यानंतर दाजी महेश याने अनिताला त्रास देणे सुरू केले. तो कामावर जात नव्हता. दारू पीत होता. तो दारू पिला की, अनिताला मारहाण करायचा. दाजी महेश हा अनिता वर संशय घेत होता. अनिताचे त्याचे भावासोबत संबंध आहेत म्हणून संशय घेत होता. तुम्ही मला लग्नात सोने नाणे घातले नाही आता दया असे म्हणून त्रास देत होता. अनिताची सासू कमल बनकर ही तु नीट वागत नाही म्हणुन त्रास देत होती. मागील पाच महिन्यापूर्वी महेश याचे अनिता सोबत माळशिरस गावी त्यांच्या घरी भांडण झाले होते. तेव्हापासून माझी बहीण अनिता ही आमच्या घरीच आहे. तो तिला सोडचिट्टी मागत आहे. माझ्या बहिणीला सोडचिट्टी घेण्याची इच्छा नाही. तरी सुद्धा जबरदस्तीने तो माझ्या बहिणीला सोडचिट्टी घे म्हणून त्रास देत आहे.मागील पंधरा दिवसापासून तो आमच्या घरी सारखा येत आहे.
तो माझ्या बहिणीला सारखा बाहेर चल म्हणून मागे लागायचा. बहीण त्याच्यासोबत जात नव्हती. तरी सुद्धा तो जबरदस्तीनेतिला घेऊन जात होता. माझ्या बहीणीला तो पैसे मागत असायचा तिचा मोबाईल घेऊन सारखा चेक करायचा तू दुस-या कोणा कोणाला बोलते असे म्हणायचा.
काल रात्री आठ वाजता च्या सुमारास तो आमच्या घरी आला. तो बहिणी सोबत भांडण करू लागला. त्यानंतर बहिणीने त्याला तू आमच्या घरी तमाशा करू नको. तू इथून जा असे म्हणून पाठवून दिले. मला म्हणायचा की तुझ्या बहिणीला कामाला जाऊ नको असे सांग मी नाही म्हणालो तर मलाच आई बहिणीवर शिव्या दिल्या.
आज सकाळी माझी बहीण नऊ वाजता च्या सुमारास कामाला गेली. सकाळी मला दाजी महेश चा फोन आला. अनिता कुठे आहे असे विचारले. मी त्यांना कामाला गेली आहे असे सांगितले. माझी बहीण काम संपल्यानंतर अकरा वाजता घरी येते. पण आज ती घरी आली नाही. ती ज्या ठिकाणी काम करते तिथे आज जास्त काम होते म्हणून उशीर होईल असे माझ्या आईला सांगून गेली होती. म्हणून आम्ही फार लक्ष दिले नाही. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ज्या ठिकाणी कामाला जाते त्या मालकाचा फोन आला. अनिता मरण पावली आहे. तुम्ही लवकर सासवड चौकीला जा. असे सांगितल्यानंतर आम्ही रात्री सासवड चौकीला आलो. तिचे प्रेत सरकारी दवाखान्यात होते.
त्या ठिकाणी जाऊन पाहिले. तिच्या गळ्यावर जखम दिसत होती. अंगावरील कपडे रक्ताने भरलेले होते. तिला मारून टाकले होते. त्यानंतर मी माझा दाजी महेश याला फोन करू लागलो. परंतु त्याचा फोन बंद येत होता. त्यानेच माझ्या बहिणीला मोटरसायकलवर बसवून घेऊन गेला होता असे गल्लीतील लोक म्हणत होते. तो फोन बंद करून गायब झाला आहे. त्यानेच माझ्या बहिणीचा खून केला आहे.तरी अनिताची सासु कमलाबाई पंडीत बनकर हिने तु नीट वागत नाही असे म्हणुन व माझा दाजी महेश पंडीत बनकर राहणार माळशिरस ता.पुरंदर जि.पुणे यांनी माझ्या बहिणीला लग्न झाल्यापासून चारित्र्यावर संशय घेऊन छळ केला व दि.25/2/2023रोजी सायंकाळी 6/00 वा. चे सुमारास सासवड जवळ फॉरेस्ट मध्ये नेऊन तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारले आहे. म्हणून माझी महेश बनकर, कमलाबाई बनकर यांचे विरूध्द तक्रार आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.महांगडे करित आहेत.