पुणे
४ सप्टेंबर २०१९ रोजी सासवडच्या जाहीर निवडणूक सभेत आमदारांनी खिशातले १२०० कोटी टाकून गुंजवणीचे पाणी आणतो अशी घोषणा केली होती. लोकांनी त्यासाठी आमदारांना मतंही दिली. आज ०४ सप्टेंबर २०२४ उगवला आहे. आमदारांच्या घोषणेला बरोब्बर ५ वर्ष पूर्ण झाली असून गुंजवणीचे पाणी कुठवर आले असा सवाल माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. आमदारांच्या घोषणेला ५ वर्ष पूर्ण झाल्याचा मुहूर्त साधत शिवतारे यांनी प्रसिध्दी पत्रक काढून आमदार संजय जगताप यांच्यावर घणाघात साधला आहे.
शिवतारे म्हणाले, मी गुंजवणीसोबतच प्रशासकीय इमारत, क्रीडा संकुल, जेजुरी रुग्णालय, फुरसुंगी उरुळी पाणीयोजना, कचरा कॅपिंग, येवलेवाडीला निसर्गोपचार हॉस्पिटल, ४५० पेक्षा अधिक बंधारे, ४०३ किलोमीटर रस्ते, ११०० शेततळी, धान्य गोदाम, आरटीओ ऑफिस, शासकीय विश्रामगृह, जेजुरी विकास आराखडा असे अनेक प्रकल्प तालुक्यात राबवले. संजय जगताप यांनी स्वतःच्या बुद्धीने पाच वर्षात तालुक्यात उभारलेला एक प्रकल्प दाखवा असे आव्हानही शिवतारे यांनी दिले. पाच वर्षात केवळ विमानतळाला विरोध, गुंजवणी जलवाहिनीला विरोध, राष्ट्रीय बाजाराला विरोध, महामार्गाला विरोध एवढाच एककलमी कार्यक्रम त्यांनी तालुक्यात राबवला.
मागील पाच वर्षात आमदारांच्या आशीर्वादाने तालुक्यात जुगार, मटका, खून, दरोडे, मारामाऱ्या यांना बरकत आली. रस्ते अपघातात फक्त एका वर्षात १५० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. वीर आणि घोरवडी धरण तुडुंब भरले असतानाही आज त्यांच्याच सासवड गावात पिण्यासाठी रोज पाणी मिळत नाही. २०१८ साली मंजूर झालेली भुयारी गटार योजना ७ वर्ष झाली त्यांना पूर्ण करता आली नाही. शहरात सगळीकडे चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आमदारांनी पुरंदर हवेलीच्या जनतेला पाच वर्ष केवळ खुळ्यात काढायचं काम केलं असही शिवतारे म्हणाले.