पुरंदर
पुणे जिल्हा परिषदेचा सन 2020-21 चा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राजवाडी गावचे प्रगतशील बागायतदार तानाजी नामदेव जगताप यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुण्यातील विधान भवन या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.
तानाजी जगताप यांच्या आधुनिक शेतीचा प्रत्येक शेतकऱ्याने आदर्श घ्यावा अशा प्रकारची ते आधुनिक शेती करतात.
त्यांच्या शेतात भले मोठे शेततळे असून या शेततळ्याच्या माध्यमातून ते सर्व पिकांना ठिबकचा वापर करतात. मल्चिंग वर शेती करून त्या ठिकाणी पेरू, गुलाब,फुलशेती अशा प्रकारची पिके ते घेतात. तसेच त्यांच्याकडे पाणी उपसा करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प देखील आहे. या शेतीच्या माध्यमातून व गुरांच्या माध्यमातून त्यांनी गोबरगॅस प्रकल्प देखील उभारला आहे.
या पुरस्काराबाबत बोलताना तानाजी जगताप यांनी सांगितले की, आई-वडिलांचा आशीर्वाद व कुटुंबाची मिळालेली साथ यामुळेच हा पुरस्कार मला मिळू शकला. तसेच आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर ही शेती नोकरीलाही वरचढ आहे. शेतकऱ्यांनी एकाच पिकाच्या मागे न लागता सर्वसमावेशक शेती करावी.
तानाजी जगताप यांना जिल्हा परिषदेचा सन 2020-21 चा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याने पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.