मुंबई
ठाण्यात अवैध फेरीवाल्यांची मुजोरीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. साहाय्यक महापालिका आयुक्त कल्पिता पिंपळे यांची तीन बोटं छाटली गेली आहेत. आरोपी पोलिसांकडून सुटला तर मनसेकडून मार खाईल, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
फेरीवाला सुटल्यानंतर आधी पोलिसांचा मार खाईल, त्यानंतर मनसेकडून त्याला इंगा दाखवला जाईल. आता अटक केली. त्यानंतर त्यांना जामीन मिळेल आणि ते बाहेर येतील. यांना ठेचले पाहिजे. अधिकाऱ्याची बोट छाटली, याआधी अशी कोणाची हिम्मत झालेली नाही. भीती काय असेल तर ते जेलमधून बाहेर येतील, त्यावेळी त्यांना समजेल. भीती काय असते ती, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. यांची जेव्हा बोट छाटली जातील आणि त्याला जेवता येणार नाही, त्यावेळी त्याला समजेल, असा सज्जड दमच राज ठाकरे यांनी दिला आहे.
ठाण्यात फेरीवाल्यांची मुजोरी अधिकाऱ्यांच्या जीवावर उठली. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केला. हल्लेखोर फेरीवाला अमरजीत यादव याच्या या हल्ल्यात कल्पिता यांची तीन बोटं छाटली गेली आहेत.
कल्पिता यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या ब़ॉडीगार्डचंही एक बोट या हल्लेखोरानं तोडलंय. या दोघांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आलंय. अमरजीत यादव याला पोलिसांनी अटक केलीय. मात्र या निमित्ताने फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.