वाजत गाजत  फटाक्यांच्या आतषबाजीत गुंजवणीचे काम सुरु

वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत गुंजवणीचे काम सुरु

पुरंदर

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे भगीरथ प्रयत्न अखेरीस फलद्रुप झाले. गुंजवणी प्रकल्पाच्या जलवाहिनीचे काम तोंडल ता. पुरंदर येथे आज सुरू करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह गावोगावचे सरपंच आणि हजारो पुरंदरवासीय उपस्थित होते.

     माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्याचा दुष्काळ संपुष्टात आणण्याच्या हेतूने दीर्घ लढा देत गुंजवणी धरण पूर्ण केले. भोर आणि वेल्ह्यात जलवाहिनीचे कामदेखील सुरू करण्यात आले. मात्र आमदार संजय जगताप यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना हे काम बंद करण्यासाठी दरडावल्याने काम जवळपास दीड महिना ठप्प होते. आमदारांच्या या आडवाआडवीच्या धोरणामुळे पुरंदर तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागल्याने शिवतारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करत त्यांनी काम चालू करण्यासाठी आग्रह धरला. अखेरीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिवतारे यांच्या समोरच मुख्य अभियंत्यांना दूरध्वनी करून काम चालू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज हे काम सुरू करण्यात आले.

आयुष्याचं सार्थक गुंजवणीत – शिवतारे

  यावेळी बोलताना शिवतारे म्हणाले, या योजनेवर लाखो शेतकऱ्याचं भवितव्य अवलंबून आहे. आमदारांनी याचं भान ठेवून यापुढील काळात मदत नाही करता आली तर निदान अडथळे करू नयेत अशी अपेक्षा आहे. व्यक्ती म्हणून विजय शिवतारे आज आहे, उद्या कदाचित नसेल पण ही योजना आयुष्यचं सार्थक करणारी आहे.  या पाण्यातून निर्माण होणाऱ्या कणसात, फळफुलात विजय शिवतारे शेकडो वर्षे जिवंत असेल असे भावोद्गार श्री. शिवतारे यांनी यावेळी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *