पुणे
सोलापुरात एका विवाहितेची अनैतिक संबंधातून निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला ही चोरीची घटना वाटत होती. मात्र तपासानंतर धक्कादायक माहिती उघड झाली अन् सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.केतन जैन नावाच्या आरोपीने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणाऱ्या पूनम बालाजी निरफळ (वय ३५) हिचा धारदार शस्त्राने खून केला. आधी आरोपीने स्टोलच्या सहाय्याने तिचा गळा आवळला, नंतर तिच्या गळ्यावर शस्त्राने १६ ठिकाणी आणि पाठीवर एक असे १७ वार केले. शवविच्छेदनातून ही माहिती उघड झाली. आरोपी केतनला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
बार्शी शहरात उपळाई रोडवर शेंडगे प्लॉट येथे सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरा तिचे पती बालाजी निरफळ यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. आरोपी केतन प्रकाश जैन विरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी जैन हा बार्शी शहर पोलिसात हजर झाला.
पूनम ही उपळाई रोडवर शेंडगे प्लॉट येथे पतीसोबत राहात होती. सोमवारी दुपारी तिचे पती धाराशिवला गेले. पत्नीने आज तुळशी विवाह असल्याने येताना ऊस घेऊन या, असा फोनवर निरोप दिला होता. बालाजी हे चार वाजण्याच्या दरम्यान परतले असता गेट, घराचे दरवाजे बंद दिसले. त्यांनी पूनमला कॉल केला तरी ती फोन उचलत नव्हती. त्यामुळे त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना जबर धक्का बसला. पूनमचा गळा चिरलेला अन मृतावस्थेत ती रक्ताच्या थारोळ्यात आढळली.
खुनानंतर बालाजी निरफळ यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केतन हा घरातून बाहेर पडताना दिसत होता. ५ ते ६ वर्षापूर्वी केतन आणि पूनमने परस्परांना मोबाइलवर केलेले मेसेज आढळले आहेत ज्यावरुन अनैतिक संबंधातून खून झाल्याचे तपासात पुढे आले.पतीने सांगितले की, मुलाने याबाबत खळबळजनक माहिती दिली. “केतन काका वारंवार घरी येत होते. ते आईला शिवीगाळ व मारहाण करायचे. आई म्हणायची की, हे कोणाला सांगायचं नाही, नाहीतर मी रागावेन. त्यामुळे मी आजवर सांगितलं नाही,” असं मुलाने सांगितल्याचे पतीने म्हटलं.

