गुर्‍हाळावर काम करण्यासाठी पन्नास ऊसतोड मजूर देतो असे म्हणत पुणे जिल्ह्यातील “या” गावच्या पोलीस पाटलांची थेट पाच लाखांची फसवणूक

गुर्‍हाळावर काम करण्यासाठी पन्नास ऊसतोड मजूर देतो असे म्हणत पुणे जिल्ह्यातील “या” गावच्या पोलीस पाटलांची थेट पाच लाखांची फसवणूक

पुणे

गुर्‍हाळावर काम करण्यासाठी 40 – 50 ऊसतोड मजूर आणून देण्याचे आमिष दाखवून दोन चुलत भावांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पोलीस पाटलांची 5 लाख 22 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना 2024 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत घडली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कालूसिंग पावरा व भाईदास पावरा (दोघेही रा. तेलखडे, ता. धडगाव, जि. नंदुरबार) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी दादा पाटील उर्फ लक्ष्मण दशरथ काळभोर (वय 59, रा. तरवडी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लक्ष्मण काळभोर हे लोणी काळभोर गावाचे पोलीस पाटील आहेत. त्यांचा कृष्णाई गुळ उद्योग समूह या नावाने गुर्‍हाळ व्यवसाय आहे. काळभोर यांच्याकडे कालुसिंग पावरा हा गुर्‍हाळावर ऑक्टोबर 2024 पासून काम करीत होता. एप्रिल 2025 मध्ये कालुसिंगने सांगितले की, आमच्या गावाकडे ऊसतोड मजूर आहेत.

त्याचा चुलत भाऊ भाईदास पावरा हा टोळीचा मुकादम आहे. त्याच्याकडे ओळखीचे 40- 50 कामगार असून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना घेऊन येतो. गावाला गेल्यानंतर कालुसिंगने काळभोर यांना फोन करून सांगितले की, कामगार भेटले असून त्यांना 20 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स पाठवून द्या. त्याप्रमाणे 22 हजार रुपये पाठवले.

10 मे 2025 रोजी कालुसिंग पावरा याचा काळभोर यांना पुन्हा फोन आला. कामगारांची जुळवाजुळव झाली आहे. कामगारांना उचल द्यावी लागेल, त्यासाठी 5 लाख रुपये रोख घेऊन या.कामगार मिळतील या आशेने काळभोर 5 लाख रुपये रक्कम घेऊन नंदुरबार येथे गेले. काळभोर यांनी कालुसिंग पावरा याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून ही रक्कम त्याच्याकडे सुपूर्द केली.

काळभोर यांनी यावेळी रक्कम देताना मोबाईलमध्ये शुटींगदेखील केले आहे. अद्यापपर्यंत ते कामासाठी आले नाहीत. याप्रकरणी लक्ष्मण काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *