पुणे
वंशाला दिवा हवा या पोकळ अट्टहासामुळे एका गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. सातत्याने होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून ऋतुजा सागर चुंबळकर (वय 26, रा.हेरंब अपार्टमेंट, बालाजीनगर) हिने विष प्राशन करून जीवन संपवले. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात ऋतुजाच्या पती सागर चुंबळकरविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी असलेल्या ऋतुजाच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजाचा विवाह जानेवारी 2024 मध्ये बारामती तालुक्यातील सागर चुंबळकर याच्याशी झाला होता. ऋतुजा एका बँकेत नोकरी करत होती, तर सागर हा एका फायनान्स बँकेत कार्यरत आहे.
विवाहाला साधारण दीड वर्ष पूर्ण झाल्यानंतर ऋतुजा गरोदर राहिली. त्यावेळी पती सागर याने “मुलगा झाला पाहिजे, मुलगी झाली तर नांदवणार नाही” अशी धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकल्याचा आरोप आहे.
या सततच्या छळामुळे ऋतुजा माहेरी गणेश पेठेत राहण्यासाठी गेली होती. मात्र तिच्या वडिलांनी समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवले. परंतु मुलगाच झाला पाहिजे या पतीच्या हट्टामुळे ऋतुजा तीव्र मानसिक तणावाखाली होती. अखेर या तणावाला कंटाळून चार महिन्यांची गर्भवती असताना ऋतुजाने विषारी औषध प्राशन केले.
तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु 27 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी पती सागर चुंबळकरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील करत आहेत.