पुणे
उंब्रज नं. १ (ता. जुन्नर) च्या महिला ग्रामपंचायत सदस्याने चौथऱ्याच्या घडीव दगडाची चोरी केल्यामुळे त्याना ओतूर (ता. जुन्नर) येथील पोलिसांनी अटक केली आहे. सदर ग्रामपंचायत सदस्याला मा.न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एल जी थाटे यांनी दिली.
प्रियांका विकास हांडे, रा. उंब्रज नं. १, ता. जुन्नर असे अटक केलेल्या महिला ग्रामपंचायत सदस्याचे नाव असून ता. १९ सप्टेंबर रोजी सदर अटक महिलेला मा.न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. याबाबत ओतूर पोलिसात निलेश सुरेश हांडे रा. उंब्रज नं. १, ता. जुन्नर यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की ४ मे ते ७ मे २०२५ या कालावधीत उंब्रज नं. १ मधील प्लॉट नं. २४९ (अ) मधील ५ मिटर रुंद व १४ मिटर लांबीचा १२ ब्रासच्या घडीव दगड चौथाराच्या आरोपी प्रियांका हांडे हिने चोरून नेल्या.या दगडाची किंमत प्रत्येकी १ ब्रास ३ हजार रुपये प्रमाणे एकूण ३६ हजार रुपये इतकी होती.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीस ता. १८ सप्टेंबर रोजी अटक केली असून, ता. १९ सप्टेंबर रोजी तिला न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एल जी थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळशिराम भवारी हे करीत आहेत.