पुणे
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी चांगला आराखडा बनविला आहे.देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ हे पुरंदर विमानतळ असणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.विमानतळ उभारण्यासाठी पाच वर्षे लागतात. मात्र, आम्ही तीन वर्षांत पुरंदर विमानतळ उभारू, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.उपमुख्यमंत्री पवार यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी पवार यांनी पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. पुरंदर विमानतळासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले, की पहिल्यांदा पुरंदर विमानतळासाठी अनेक जणांनी विरोध केला होता. आतापर्यंत 90 टक्के लोकांनी विमानतळासाठी संमती दिली आहे. पुरंदर विमानतळाचा आराखडाही चांगला बनविला असून, दोन धावपट्ट्या असणार आहेत. विकास अथवा सुधारणा करायाची असेल, तर हवेत करता येत नाही. त्यासाठी जमीन पाहिजे.
आधी साडेसात हजार एकरावर विमानतळ करणार होतो. आता तीन हजार एकरवर विमानतळ उभारतोय.वरसगाव, खडकवासला, टेमघर ही धरणे बांधली. या धरणांचे पाणी आपण पितोय. त्यासाठी कुणाच्या तरी जमिनी गेल्यात ना? असा सवाल पवार यांनी केला. कुणाची तरी घरे गेली. वर्षानुवर्षे शेती करतात, पिढ्यानपिढ्या येथे राहतात.
एवढे मोठे उजनी धरण बांधले. समुद्रासारखे ते दिसते. त्यासाठी पण अनेकांच्या जमिनी गेल्या आहेत. आता पुण्यातून रिंगरोड केला जात आहे. त्यासाठी चारपट मोबदला दिला आहे. यासह पीएमआरडीएचा रिंगरोडसुद्धा हाती घेतला आहे. आम्हाला कुणाला नाराज करायचे नाही; पण आमचा नाईलाज आहे, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.