पुणे
पुरंदर तालुक्यातील मधलामळा येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने घराशेजारील गोठ्यात घुसून गिर जातीच्या एका वर्षांच्या कालवडीवर हल्ला करून त्याचा फडशा पाडला.येथील शेतकरी हरिश्चंद्र सिदूजी भुजबळ यांच्या बंदिस्त गोठ्यात ही घटना घडली.सकाळी गोठ्याकडे गेल्यावर वासराचा मृतदेह दिसताच भुजबळ यांनी तत्काळ वनरक्षक ए. ए. फडतरे यांना माहिती दिली.
वनमजूर हनुमंत पवार, प्रेम दाते, किरण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.या हल्ल्यात शेतकर्यांचे सुमारे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, ग्रामस्थांनी तत्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
बुधवारी मध्यरात्री आडाचीवाडी येथील ज्येष्ठ शेतकरी तारूबाई शिर्के यांच्या पाळीव कुत्र्याचा, तर गुरुवारी रात्री वाल्हे-पिंगोरी रस्त्यावरून जाताना दोन युवकांच्या समोर बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे युवकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. गेल्या आठवडाभरात आडाचीवाडी परिसरात तिनदा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.
वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.वनपाल दिपाली शिंदे यांनी सांगितले की, सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून लवकरच पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत.