पुणे
पतीपासून अलिप्त राहत असलेल्या परित्यक्ता महिलेशी शादी डॉट कॉम साईटवर ओळख केली.त्यानंतर एकांतात बोलण्याच्या बहाण्याने भेटण्यास बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील एका लॉजवर २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
तसेच वारंवार शारिरीक संबंध ठेवण्यासाठी आरोपीने महिलेला धमकी दिल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत दिनकर थोरात (वय ३०, चाकण, पुणे)असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी एका २५ वर्षीय पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिडीता विवाहित असून पतीपासून अलिप्त राहत आहे. पिडीता दोन लहान मुलींसोबत यवत येथे राहते.कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी फिर्यादी खाजगी नोकरी करते.पतीपासून घटस्फोट घेवून दुसरे लग्न करण्याचं ठरवल्याने, पिडीता शादी डॉट कॉम साईटवर योग्य जोडीदार शोधत असताना आरोपी चंद्रकांत थोरात याच्याशी ओळख झाली.आरोपीने पिडीतेचा विश्वास संपादन करत फोनवर बोलु लागले.
पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर लग्न करणार असे पिडीतेने थोरात याला सांगितले होते.फोनवर बोलत बोलत एक दिवस चंद्रकांत थोरात याने पिडीतेला बोलण्याचा बहाणा करून उरुळी कांचन येथे भेटायला बोलावले. ठरल्याप्रमाणे दोघेही २४ ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजण्याच्या भेटले.रोडवर काहीही बोलता येत नाही,एकांतात जावून बोलु असे म्हणून थोरात याने पिडीतेला त्याच्या शाईन गाडीवर बसवून,पुण्याच्या दिशेने जात कुंजीरवाडीतील एका लॉजवर नेले.
गप्पा मारताना आरोपी पिडीतेशी शारिरीक जवळीक करु लागला.त्यानंतर चंद्रकांत थोरात याने पिडीतेकडे शरीर सुखाची मागणी केली, पिडीतेने लग्नानंतर आपण शारिरीक संबंध ठेवू असे सांगूनही आरोपीने काही न ऐकता पिडीतेसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.त्यानंतरही आरोपी पिडीतेला फोन करून भेटण्यास बोलावून शारिरीक सुखाची मागणी करत होता.
याप्रकरणी २५ वर्षीय पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी चंद्रकांत थोरात याच्यावर भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ६४,३५१(२),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.

