पुणे
भरधाव टेम्पोने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना जोरात धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन गावाच्या हद्दीतील तळवाडी चौक बस थांब्यावर बुधवारी (ता.२) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
महबूब रहमान मियाडे (वय ६३, रा. सहजपूर, माकरवस्ती,ता. दौंड, जि. पुणे), अशोक भीमराव (वय २५,रा. बसनाळ सावली बिदर कर्नाटक) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
तर लक्ष्मण बापूराव भारती (वय ६१, रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे), वैशाली भागवत बनसोडे (वय ४०), भागवत पेरू बनसोडे (वय ४०, दोन्ही रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे), मैनुदिन लालमिया तांबोळी (वय ६७, रा. आंबा पिंपळगाव लातूर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत जमीर महबूब मीयाडे (वय ३३, रा. सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड, जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महबूब मियाडे, अशोक भीमराव, लक्ष्मण भारती, वैशाली बनसोडे, भागवत बनसोडे, मैनुदिन तांबोळी हे सर्व प्रवाशी पुणे-सोलापूर महामार्गाच्या हद्दीतील उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकातील बस थांब्यावर बुधवारी (ता. २) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बस साठी उभे होते. त्यावेळी भरधाव वेगाने येणारा टेम्पो (एम एच ४५ टी १८७९) हा मुख्य रस्ता सोडून प्रवाशांच्या दिशेने गेला.
यामध्ये मियाडे आणि भीमराव यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य प्रवाशी जखमी झाले. त्यानंतर टेम्पो चालक हा घटनास्थळावरून फरार झाला. जखमींवर खासगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.