पुणे
खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांच्या अनुपस्थितीत त्यांचा मुलगा मृण्मय बाबाजी काळे हे डमी आमदार म्हणून भूमिका बजावत आहेत. आमदारपुत्रांच्या या लुडबुडीमुळे तालुक्यातील अधिकारी आणि कार्यक्रम आयोजकांची मोठी गोची होत आहे.आमदार अनुपस्थित असले की मृण्मय काळे हेच आमदार म्हणून उपस्थित राहून थेट अध्यक्षपद देखील भूषवतात, यामुळे कार्यक्रमाच्या ‘प्रोटोकॉल’ची ‘ऐशीतैशी’ होऊन जाते.
मंगळवारी कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त तालुक्यातील गुणवंत शेतकर्यांचा सन्मान व सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘प्रोटोकॉल’नुसार तालुक्याच्या आमदारांच्या अध्यक्षतेखालील हा कार्यक्रम कृषी विभागाने आयोजित केला होता.
यासोबत अनेक वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. परंतु, आमदार बाबाजी काळे हे अधिवेशन सुरू असल्याने अनुपस्थितीत होते. आमदार अनुपस्थितीत असल्यावर नियमानुसार अन्य वरिष्ठ व्यक्तीला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिले जाते.
परंतु, खेड तालुक्यात आमदार अनुपस्थितीत असले, तर त्यांचा मुलगा मृण्मय काळे हे सर्व ठिकाणी हजर असतात. मतदारसंघातील दशक्रिया विधी, पूजा, लग्नसमारंभ यांसारख्या कार्यक्रमांसाठी वडिलांच्या अनुपस्थितीत हजर राहून त्यांच्या वतीने शुभेच्छा देणे किंवा दु:खात सहभागी होणे आपण समजू शकतो. आमदाराचे नाव सांगून अधिकारी व प्रशासनाला दमदाटी करणारे अनेक आमदारपुत्र आहेत.
परंतु, खेड तालुक्यात सर्वच ठिकाणी बाबाजी काळे अनुपस्थित असताना त्यांचा मुलगा डमी आमदार म्हणूनच उपस्थित राहतात. कार्यक्रमात आमदार असल्यासारखे अध्यक्षपद देखील भूषवतात. कार्यक्रमामध्ये इतर वरिष्ठ व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते अथवा वरिष्ठ अधिकारी असले तरी मृण्मय काळे यांना आमदार असल्याचा मान देऊन पद व भाषण करण्याची संधी सर्वांच्या शेवटी द्यावी लागत आहे.
एका जाहीर कार्यक्रमात देखील आमदारपुत्र म्हणजे आमदार नाही, यावरून विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले होते. परंतु, गेल्या काही महिन्यांत पुन्हा एकदा या आमदारपुत्राची लुडबुड प्रचंड वाढली आहे. तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, कार्यक्रमांचे आयोजक यांची या आमदारपुत्रामुळे प्रोटोकॉल पूर्ण करताना मोठी गोची होते.