पुणे
विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्व चित्र पाहिलं, मावळची शिवशक्ती पाहिली होती. काही निर्णय धाडसाने घ्यावे लागतात. तिथे मागे पुढे बघायचं नाही. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडला पाहिजे. हे एकच लक्ष आहे.
महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात सुखाचे, समाधानाचे दिवस आणायचे असतील, तर धडाकेबाज निर्णय घ्यावे लागतात. मला समाधान आहे, मला आनंद आहे की अडीच वर्षात हा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून फिरला आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना केली. शेतकऱ्यांना वीज बील माफ केलं. ज्येष्ठांची योजना केली. तेव्हा लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालणारे लोक आले.
मी तेव्हा लाडक्या बहिणींना सांगितलं, हे दुष्ट सावत्र भाऊ यांनी खोडा घातलाय, निवडणुकीत यांना जोडा दाखवा, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. शिंदे सासवडच्या शिवसेनेच्या आभारसभेत बोलत होते.एकनाथ शिंदे जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, तुम्ही महायुतीवर, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं आणि तुमचे आशिर्वाद सदैव पाठिशी राहतील, पाठिशी ठेवा.
तुम्ही विधानसभेत जसा विश्वास दाखवला, तसा कायम विश्वास दाखवा. तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही, हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. काय विरोधकांची हालत झाली आहे. युद्धातही हरले आणि तहातही हारले. ज्या महाराष्ट्र द्रोह केला, त्यांना पुरंदर अशीच शिक्षा देतो. ते आता या महाराष्ट्राला कळलं आहे.
पुरुंदर महाराष्ट्राचा पहारेकरी आहे आणि आपले शिवसेनेचे शिलेदार विजयबापू देखील पुरंदरचे पहारेकरी आहेत. म्हणून मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो.पुरंदरच्या अभेद्य बुरुजासारखे आपले विजयबापू शिवतारे आज आपल्यासोबत आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत आहात. निवडणुकीच्या प्रचारासाठी जेव्हा सासवडला आलो होतो. त्यावेळी याच पालखी मैदानात गुलाल उधळायला येईल, असा शब्द दिला होता आणि पुरंदरचा किल्लेदार हा विजयबापू शिवतारेच असेल, असंही मी सांगितलं होतं.
आता फक्त मी विजयाचा गुलाल उधळायला आलो नाही. मी माझ्या तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, ज्येष्ठ लाडके मतदार या सर्वांचे आभार मानायला आलोय. मी आपल्या सगळ्यांना वंदन करायला आलो आहे, असंही शिंदे म्हणाले.