पुरंदर
पुरंदर तालुक्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे हायस्कूल सासवड या शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे.
शिक्षकाने चक्क विद्यार्थ्यांच्या कानाखाली चापट मारत विद्यार्थ्याला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की दिनांक 23/7/2024 रोजी हर्षल संतोष कचरे हा नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेला होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघिरे हायस्कूल येथे गणिताच्या तासादरम्यान गणिताचे शिक्षक गणेश पाठक यांनी मुलांना गणिताच्या वह्या बेंच वरती काढून ठेवायला सांगितल्या. परंतु हर्षल याची वही घरी राहिली म्हणून तो शांत बसला असता शिक्षक गणेश पाठक यांनी वह्या चेक करत असताना हर्षल याच्या डाव्या कानाला जोरात कानाखाली चापट मारून गंभीर दुखापत केली असुन त्याच्या कानाचा पडदा फाटला आहे.
तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षा करणे कायद्याने बंदी असतानाही शिक्षक पाठक यांनी सदरचे कृत्य केले आहे. हर्षल हा इयत्ता पाचवीत शिकत असून इतक्या लहान विद्यार्थ्याला एवढ्या जोरात मारणे हे शिक्षकी पेशाला शोभते का?असाच प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
याबाबतची तक्रार हर्षल चे वडील ॲड.संतोष बाळासो कचरे यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे दिले असून याबाबतचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हिप्परकर करीत आहेत.