पुणे
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे काल शुक्रवारी रात्री दहशत वाजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि एका तरुणाला आणि त्याच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या जेजुरी पोलिसांनी आवळल्या आहेत. अक्षय शेवाळे असं या तरुणाचं नाव असून हा तरुण रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले आहे.
अक्षय शेवाळे याने काल रात्री साडेदहा वाजलेच्या दरम्यान साताऱ्यातील सेंद्रे येथून बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे निघालेल्या सचिन कोरडे आणि त्याच्या वडिलांना जबर मारहाण केली होती. यानंतर त्यांची मोटरसायकल छत्रपती शिवाजी चौकामध्ये आणून ती पेटून देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र आज याबाबत नीरा पोस्टमध्ये तक्रार देण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी अक्षय शेवाळे याला ताब्यात घेतले. मात्र हाच अक्षय शेवाळे आज दुपारी पळून जाण्याचा प्रयत्न होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि यानंतर पोलिसांनी त्याला सातारा जिल्ह्यातील पिंपरी बुद्रुक या गावापर्यंत पाठलाग करून ताब्यात घेतले.
अक्षय शेवाळे यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले त्या पोलीस हवलदार संदीप मदने आणि पोलीस नाईक हरिश्चंद्र करे यांचं कौतुक नीरा परिसरातून करण्यात येत आहे. तर दहशत मजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी निरा ग्रामस्थ आता करीत आहेत.