“महिला बचतगट नको गं बाई”…. पुरंदर मध्ये महिला बचत गटाच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे;”या” गावातील महिलांची लाखो रूपयांची फसवणूक

“महिला बचतगट नको गं बाई”…. पुरंदर मध्ये महिला बचत गटाच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे;”या” गावातील महिलांची लाखो रूपयांची फसवणूक

पुरंदर

पुरंदर तालुक्यामध्ये बोगस महिला बचत गट तयार करून त्यांच्या नावे कर्ज प्रकरणे करून महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी फसवणूक झालेल्या महिलांकडून होत आहे.


याबाबत शिवरी (ता.पुरंदर) येथील महिला ज्योती नवनाथ गायकवाड व आरती अरूण कामथे यांच्या म्हणण्यानुसार त्यांची नावे माळशिरस येथील विडोबा महिला बचत गटामध्ये टाकून त्यांच्या नावे मांजरी पुणे येथील एच.डी.एफ.सी. बँकेच्या शाखेतून १०.५० लाख रुपये कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचे सांगितले.
सदर कर्ज हे मार्च २०२३ मध्ये काढल्याचे निष्पन्न होत असून यामध्ये काही प्रमाणामध्ये बँकेत भरणा होत होता त्यामुळे संबंधित महिलांना याची कोणतीही प्रकारची कल्पना नव्हती परंतु काही दिवसापूर्वी संबंधित बँकेचे अधिकारी कर्जाची परतफेड वेळेवर होत नसल्याने वसुलीसाठी या महिलांच्या घरी आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत त्यांनी सखोल चौकशी केली असता त्यांची नावे ही माळशिरस येथील या बचत गटामध्ये असून संबंधित गटाने साडे दहा लाख रुपये कर्ज घेतले असून प्रत्येक महिलेच्या नावावरती 75 हजार रुपये नावे टाकण्यात आले आहेत परंतु प्रत्यक्षात या महिला या बचत गटाच्या सभासदही नाहीत अथवा त्यांनी बँकेमध्ये कर्जासाठी कोणत्याही प्रकारचा विनंती अर्ज दाखल केला नाही ,कोणत्याही प्रकारची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग ही झाली नाही,कर्ज देताना बँकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची चौकशी ही झाली नाही, बनावट मोबाईल नंबर,खोट्या सह्या करून हा घोटाळा झाल्याचे त्यांनी सांगितले.


याबाबत या महिलांनी एच.डी.एफ.सी. बँकेत ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. तर जेजुरी पोलीस स्टेशनलाही तक्रारी अर्ज दिला असता त्यांनी सदर घोटाळा हा आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे सांगून सासवड पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे सांगितले होते. तेथेही सासवड पोलीस स्टेशननेही बँकेत चौकशी करून नंतर अर्ज करा असे सांगितले असल्याची माहिती नवनाथ गायकवाड यांनी दिली. घोटाळा समोर दिसत असूनही आमच्या तक्रारीची कोणीही दखल घेत नसल्याने मानसिक त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.


याबाबत ज्या बचत गटाच्या नावे कर्ज प्रकरण करण्यात आले आहे त्या विडोबा महिला बचत गटाच्या अध्यक्षा राजश्री महाले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काही दिवसांपूर्वी सासवड येथील एक पुरुष व एक महिला येऊन आमच्याकडून तुम्हाला बचत गटाला दोन लाख रूपये बिनव्याजी कर्ज देतो म्हणून आमच्या २५ ते ३० महिलांची कागदपत्रे जमा केली.

नंतर तुम्हाला दोन लाख कर्ज घेता येत नाही दहा लाख रुपये कर्ज प्रकरण लागेल असा बनाव करत एका गटाच्या नावे साडेदहा लाख रुपये तर दुसऱ्या गटाचे नावे साडेपाच लाख रुपये कर्ज काढून त्यापैकी दोन दोन लाख रुपये आम्हाला बिनव्याजी वापरण्यासाठी दिले यातील हप्ते आम्ही नियमित भरत आहे मात्र उर्वरित रक्कमेशी आमचा कोणताही संबंध नसून आमची ही फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले ही सर्व माहिती बँकेच्या अधिका-यांनाही असल्याचे त्यांनी सांगितले.


याबाबत संबधित एजंटांनी आम्हाला पैसे भरणा केल्याच्या बॅंकेच्या शिक्यानिशी स्लिपा दाखवल्या मात्र चौकशीअंती सदर स्लिपाही बनावट असल्याचे महाले यांनी सांगितले व याबाबत आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली.
याबाबत बॅंकेच्या अधिका-यांशी संपर्क केला असता सदर प्रकार ८ ते १० बचत गटाबाबत घडल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा देत वरीष्ठ कार्यालयाकडून चौकशीच्या सुचना आल्या असुन फसवणूक झालेल्या महिलांनीही खरी माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन ही केले आहे.


सदर प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे असून यामध्ये आमची कागदपत्रे संबंधित गटापर्यंत, बँकेपर्यंत कशी पोहोचली, या गटाच्या नावे ज्याप्रमाणे बोगस कर्ज् प्रकरण झाले आहे अशा प्रकारची कर्ज प्रकरणे तालुक्यातील अन्य गटाच्या नावेही झाली असल्याची शक्यता असुन अशा बोगस प्रकरण करणा-या एजंटांची व बोगस कर्ज प्रकरणे मंजूर करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांची ही सखोल चौकशी करावी व यातील सर्व रक्कमेची वसूली करत दोषीवर कडक कारवाई व्हावी यासाठी पोलीसांनी येथे दखल घेतली नाही तर आम्ही वरीष्ठ पोलीस अधिका-यांकडे तक्रार करणार असल्याचे फसवणूक झालेल्या महिलाचे पती नवनाथ गायकवाड व अरुण कामथे यांनी सांगितले.

महिला बचतगट नको गं बाई….
सदर प्रकार हा इतका बेमालूम का कसा झाला याबाबत अनेक बचत गट चालकांना सतावत असून जा प्रकार पंचायत समिती स्तरावरून झाल्याच्या शंका निर्माण होत आहेत.गावोगावी पंचायत समितीचे वतीने महिलांना एकत्रित करून बचत गटाचे जाळे निर्माण केले जात आहे. याचे गाव पातळीवरच्या महिलांनी विश्वासाने स्वागत करत आपली कागदपत्रे जमा केली व या यंत्रणेतूनच संबंधित कागदपत्रांचा गैरवापर होऊन असा प्रकार होत असेल तर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा या अशा प्रकारामुळे ‘ महिला बचतगट नको गं बाई….असेच म्हणायची पाळी येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *