पुणे
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा बांधव गावागावात निदर्शने, आंदोलने, उपोषणे करत आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.
मात्र काही तरुण भावनिक होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलताना दिसत आहेत. पुण्यामधील चाकण येथे मराठा आरक्षणासाठी २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना चाकण औद्योगिक क्षेत्रातील चिंबळी येथे घडली आहे. सिद्धेश सत्यवान बर्गे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
कोणाच्या त्रासाला कंटाळुन नाही तर शासकीय कार्यपद्धतीला कंटाळुन आत्महत्या करत आहे. मराठा आरक्षण मिळावे अशी माझी इच्छा आहे, मराठा बांधवांसाठी हे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.