पुणे
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा गावात ग्रामपंचायत कार्यालय पेटून देत ग्रामसेवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत ग्रामसेवक राजेंद्र बोर्डे गंभीर जखमी झाले असून ग्रामपंचायतीमधील दस्तऐवज जळून खाक झाले आहेत.
साखरा गावात ग्रामपंचायतमार्फत वित्त आयोगाच्या निधीमधून करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी या गावातील नागरिकांनी आंदोलन केले होते.
मात्र प्रशासन ग्रामसेवकाच्या विरोधात कोणतीही कार्यवाही करत नसल्याने हा वाद झाल्याचे देखील गावातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेप्रकरणी सेनगाव पोलीस स्थानकात अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय जाळून ग्रामसेवकावर हल्ला झाला आहे. जखमी ग्रामसेवकावर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेत साखरा गावातील ग्रामपंचायत मधील अनेक जुने दस्तऐवज जळून खाक झाले आहेत.
ग्रामसेवकाने स्वतःच कट कारस्थान रचून घडवली असून, भ्रष्टाचाराचे प्रकरण दाबण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय जाळून टाकल्याचा आरोप या गावातील नागरिकांनी केला आहे. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.