प्रेत जळतं तिथं सनईचे सूर, स्मशानभूमीत पार पडला आगळा वेगळा विवाह सोहळा; “या” नवदाम्पत्यांची राज्यभरात चर्चा

प्रेत जळतं तिथं सनईचे सूर, स्मशानभूमीत पार पडला आगळा वेगळा विवाह सोहळा; “या” नवदाम्पत्यांची राज्यभरात चर्चा

पुणे

स्मशानभूमी म्हंटल की तिथे अंत्यसंस्कार आणि दुःखाचे आवाज कानी पडतात. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील एका स्मशानभूमीत मंगलाष्टकांचे सूर आणि अक्षतांसोबत आनंदाची उधळण बघायला मिळालीय. स्मशानभूमीत चक्क थाटामाटात अनोखा विवाह सोहळा पार पडला असून या विवाह सोहळ्याची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे. 

राहाता शहरातील स्मशानभूमीत गंगाधर गायकवाड हे २० वर्षांपासून स्मशानजोगी म्हणून काम करतात आणि त्याच ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी मयुरी ही अंत्यसंस्कार आणि आक्रोश बघत लहानची मोठी झाली. आई वडिलांना मदत करत बारावी पर्यंतचा अभ्यासही तिने इथेच केला.

एका खाजगी ठिकाणी नोकरी करत असताना तिथेच तिचे प्रेम मनोज जैस्वाल या युवकासोबत जुळले आणि दोघांनीही जातीची बंधने तोडून लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही घरच्यांची परवानगी मिळाली आणि चक्क राहाता येथील स्मशानभूमीत हा आगळा वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. ज्या ठिकाणी इतरांच्या आयुष्याचा शेवट होतो त्याच ठिकाणी मयुरी आणि मनोज यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

मयुरी आणि मनोज यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त स्मशानभूमीत सनईचे सूर निनादले, मांडव सजला आणि अक्षतांसोबत आनंदाची उधळण झाली. माजी नगराध्यक्षा ममता पिपाड आणि त्यांचे पती राजेंद्र पिपाडा यांनी दातृत्व दाखवत नव दाम्पत्याला संसारोपयोगी साहित्य भेट देत कन्यादानाची जबाबदारी पार पाडली.

मयुरी आणि मनोज यांना आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईकांसह राहाता शहरातील नागरिकही उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी स्वतः मंगलाष्टके म्हणत हा विवाह सोहळा पार पाडला.

मयूर आणि मनोज यांच्या या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. अंधश्रद्धेला मुठमाती देत स्मशानभूमीत पार पडलेला हा आंतरजातीय विवाह सोहळा इतरांनाही प्रेरणा देणारा ठरलाय एव्हढं मात्र नक्की आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *