श्रेयवादापेक्षा कामांत सुरळीतपणा आणण्यावर भर देणार :- आमदार संजय जगताप; आमदार जगताप यांचा लाभार्थी शेतकऱ्यांकडून पेढे भरवून सत्कार

श्रेयवादापेक्षा कामांत सुरळीतपणा आणण्यावर भर देणार :- आमदार संजय जगताप; आमदार जगताप यांचा लाभार्थी शेतकऱ्यांकडून पेढे भरवून सत्कार

माळशिरस

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या चांगल्या नियोजनामुळे २ . ७३ टीएमसी पाणी उपसा करता आला.
यापुढेही योजनेचे अधिकारी आणि शेतकऱ्यांत समन्वय साधून आणखी जास्त प्रमाणात पाणी उपसा करून लाभक्षेत्रातील वंचित भाग ओलिताखाली आणणे आवश्यक असून शेतकऱ्यांना ताण होणार नाही आणि पाणी पुरवठा योग्य वेळी होण्यासाठी, शिस्त आणि सुसूत्रता राहण्यासाठी पाणी वापर संस्था उभारण्याकामी आता शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगत पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजना तसेच इतर विकासकामांच्या बाबतीत श्रेयवाद करण्यापेक्षा या कामांत सुरळीतपणा आणि सुसूत्रता आणण्याबाबत भर देत असल्याचे स्पष्ट केले.


वाघापूर येथील घाटमाथ्यावरील पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या टप्पा क्र ५ येथे योजनेचा आढावा आणि उन्हाळी हंगाम पाणी पुरवठा नियोजन बैठक आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. याप्रसंगी विजयराव कोलते, सुदामराव इंगळे, प्रदीप पोमण, सुनीता कोलते, गणेश जगताप, माऊली यादव यांसह योजनेवरील गावांचे सरपंच, सदस्य, महिला पदाधिकारी, शेतकरी आणि योजनेचे अधिकारी, अभियंता उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार संजय जगताप यांनी, पाण्याचे पैसे भरण्यासाठी यूपीआय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लाभक्षेत्रातील प्रत्येक पाझर तलावापर्यंत योजनेची पाईपलाईन करण्यात येणार आहे. पाझर तलाव सतत भरत ठेवले पाहिजेत. त्यासाठी पैसेही कमी लागतील असे सांगत, योजनेमुळे पुरंदरचे ऊस क्षेत्र दिड लाख टनांवरून साडे पाच लाख टनापर्यंत गेले आहे. शेतकरी आर्थिक सक्षम झाला आहे. पुरंदरसाठी सोमेश्वर साखर कारखान्याच्या एका युनिटची मागणी केली आहे. लाभक्षेत्रातील पाणी जात नसलेल्या अडचणीच्या ठिकाणी अभियंत्यांना बरोबर घेऊन जागेवर जाऊन सर्व्हे करून कशाप्रकारे पाईपलाईन करता येईल याची पाहणी करू.

योजनेला सौर ऊर्जेच्य आधाराचीही मागणी केली असून योग्य नियोजनाने योजना आणखी कार्यक्षम चालवू असेही आमदार संजय जगताप यांनी सांगितले.योजना आठ महिने बंद होती, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांनी पाठपुरावा करून योजनेच्या दुरुस्तीसाठी ६७ कोटी ६९ लाखांचा निधी मिळविला तसेच वीजदर ३ रूपये ५६ पैसे वरून १ रूपये १६ पैसे प्रति युनिट करण्यात आले आहे. त्यामुळे ३२ हजार रुपये प्रति एमसीएफटी वरून पाण्याचा दर १८ हजार ९०० रूपये प्रति एमसीएफटी दर तिन्ही हंगामासाठी करण्यात आला आहे. याबद्दल खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांचा या बैठकीत लाभार्थी सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदनाचा ठराव करून आ जगताप यांचा पेढे भरवून सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी, पैसे भरल्याच्या आणि पाणी मागणी केल्याचे क्रमानुसार पाणी पुरवठा वेळेत करा. चांगल्या दाबाने पाणी सोडा. गळती बंद होणे आवश्यक आहे, गळतीचा भार शेतकऱ्यांवर नको. वंचित ठिकाणी पाईप लाईन करा.जनाई उपसाचे पाणी मिळत नाही. दिवे पंप हाऊस एकच मोटर सुरू आहे. दोन्ही मोटर सुरू कराव्यात अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. यावर कार्यकारी अभियंता महेश कानिटकर यांनी उत्तर देतांना,
दुरूस्तीमुळे एकच पंप सुरू होता यापुढे वेळेत पाणी पुरवठा होईल, आठ दिवसांत २४ तास योजना सुरू राहिल. आठ दिवस आधी पाणी मागणी करा, पाणी येण्याचे निश्चित झाल्यावर दोन दिवस आधी पैसे भरा. शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे पाणी सोडले जाईल. शेवटच्या भागाला दिवसाच्या वेळी पाणी दिले जाईल., असे सांगितले.

यावेळी, सुदामराव इंगळे यांनी, येथील दोन मोटर खासदार, आमदारांच्या चालू आहेत. त्याप्रमाणे योजनेच्याही तीनही मोटर सुरू ठेवाव्यात. काही लोक श्रेयवाद करीत आहेत, काही योगदान नसताना आणि न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. मात्र काम करणाऱ्या खासदार आणि आमदारांना खरे श्रेय आहे. पवार साहेबांनी योजना केली. ज्यांनी केले त्याचे नाव घ्या. इतरांवर लक्ष देऊ नका असे सांगितले. तर विजय कोलते यांनी, पुरंदर उपसा योजनेपुर्वी या भागातील लोक रोजगार हमी वर जात होते. आता योजनेमुळे समृद्ध होत आहेत. तरूण चांगल्या प्रकारे शेती, ऊस, फळबागा करीत आहेत. पाझर तलावात पाणी सतत भरून घेतले पाहिजे, पुरंदर उपसामुळे भाग्योदय झाला आहे. आर्थिक सुबत्तता आली आहे. शेती आणि पुरक व्यवसाय उत्तम आहेत, असे सांगितले. विकास इंदलकर यांनी प्रास्ताविक केले तर अक्षय उरसळ यांनी आभार मानले.

विकासकामांत राजकारण नको
पुरंदमध्ये आजपर्यंत पाण्यावर राजकारण झाले., मात्र आता पाण्यासह रस्ते, समाजमंदिर, पाणंद रस्ते आदी विकासकामांतही काही लोक गावोगावी राजकारण करून विकासकामांच्या अडथळे आणत आहेत. राजकारणाच्या ठिकाणी जरूर राजकारण करावे मात्र विकासकामांत अडसर आणू नये असे सांगत गावोगाच्या अशा मंडळींकडे लक्ष देऊ नये असे विजय कोलते आणि सुदामराव इंगळे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *