पहिल्या बायकोशी घटस्फोटाची केस सुरू असतानाच केलं दुसर लग्न ; जाब विचारण्यासाठी गेलेल्या पहिल्या बायकोच्या भावाला बेदम मारहाण

पहिल्या बायकोशी घटस्फोटाची केस सुरू असतानाच केलं दुसर लग्न ; जाब विचारण्यासाठी गेलेल्या पहिल्या बायकोच्या भावाला बेदम मारहाण

बदलापूर

पहिल्या बायकोशी घटस्फोटाची केस सुरू असतानाच एका इसमानं दुसरं लग्न केलं. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पहिल्या बायकोच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बदलापूर शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी १५ दिवस उलटूनही काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अंबरनाथ शहरात राहणारे पत्रकार मुन्नालाल उपाध्याय यांच्या बहिणीचं एप्रिल २०१२ मध्ये बदलापूरच्या वैभव पांडे याच्याशी लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर पटीने त्रास द्यायला सुरुवात केल्यानं सहा महिन्यातच त्यांची बहीण माहेरी परत आली. तेव्हापासून आज जवळपास १० वर्ष मुन्नालाल यांच्याकडेच त्यांची बहीण वास्तव्याला असून त्यांची घटस्फोटाची केस कोर्टात सुरू आहे. यादरम्यान वैभव याने घर बदललं, तसंच दुर्गेश नाव लावून २ मे २०२२ रोजी एका दुसऱ्या मुलीशी लग्न केलं.

ही बाब त्याच्या पहिल्या पत्नीचे भाऊ मुन्नालाल उपाध्याय यांना समजताच त्यांनी ५ मे रोजी वैभव याचा नवा पत्ता शोधत त्याच्या इमारतीखाली जाऊन वॉचमनकडे वैभवबाबत विचारपूस केली. याची कुणकुण लागताच वैभव पांडे आणि त्याचे वडील चंद्रभान पांडे या दोघांनी मुन्नालाल यांना कात्रपच्या रॉयल एन्फिल्ड शोरुमजवळ गाठत बेदम मारहाण केली.

या मारहाणीत मुन्नालाल यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी मुन्नालाल यांच्या फिर्यादीनुसार ६ मे रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भादंवि ३२६ अन्वये गंभीर स्वरूपाच्या मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आज तब्बल १५ दिवस उलटूनही पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळं पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

कोणत्याही प्रकरणातला आरोपी एका दिवसात पकडून आणण्याची क्षमता पोलिसांकडे आहे. मात्र या प्रकरणात ३२६ सारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून आरोपींना १५ दिवस अटक न करण्यात आल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. त्यामुळं पोलिसांनी फरार असलेल्या पांडे पिता-पुत्राला लवकरात लवकर बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *