शिरुर
शिरूर तालुक्यातील कुरूळी येथील परंतु मूळचे हडपसर येथील रहिवासी असलेल्या सत्तार पठाण यांना दीड एकराच्या उसातून १६१ टनांचे उत्पादन मिळाले आहे.
तर या उसामध्ये लागवडीच्या वेळी केलेल्या आंतरपिकातूनही त्यांनी १ लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळवले होते.
सत्तार पठाण यांनी २ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान कुरूळी येथील त्यांच्या शेतात को ८६०३२ जातीच्या उसाची लागवड केली. ही लागवड करतानाच त्यांनी आंतरपिकेही घेतली. मिरची, कोबी व फ्ल़ॉवर या भाजीपाल्याचे त्यांनी आंतरपिक घेतले. दोन महिन्यानंतर या आंतरपिकातूनच त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यानंतर भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले होते. नेमके याच काळात मागणी अधिक व पुरवठा कमी झाल्याने कोरोनाची लाट ओसरताना भाजीपाल्याचे दर वाढले.
पठाण यांच्या कोबीला प्रतिकिलो २५ रुपयांपर्यंत, मिरचीला ६० रुपयांपर्यंत दर मिळाला. परिणामी या आंतरपिकातूनच पठाण यांना १ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्याचा खर्च व उसाच्या लागवडीपासून तोडणीपर्यंतचा खर्च त्यातून मिळाल्याने पठाण यांना आता उसाच्या उत्पादनातील एकूण रक्कम अगदी बोनससारखीच मिळाली आहे.
पठाण यांनी घेतलेल्या दीड एकर क्षेत्रात त्यांनी सेंद्रीय, रासायनिक व जैविक अशा तीनही खतांचे व्यवस्थापन एकत्रित केले. पुण्यातील तेज अॅग्रोटेक इंडिया या कंपनीने त्यांना शेतीचा सल्ला व आवश्यक ती औषधे पुरवली. त्याचा तयांना फायदा झाल्याचे पठाण सांगत होते. त्याचबरोबर त्यांनी भूमी या सेंद्रीय उत्पादनाचा व शेणखताचाही वापर उसाच्या पिकासाठी केला. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून उसाची वाढ भरघोस झाली.
पठाण यांच्या उसाची नुकतीच तोडणी झाली. त्यांनी हा ऊस गुऱ्हाळासाठी दिला. २५०० रुपये प्रतिटनी या उसाला दर मिळाला असून तब्बल १६१ टन उत्पादन या दिड एकरात त्यांना मिळाले. त्यांच्या उसाची किमान ४२ व कमाल ४७ कांड्यांपर्यंत वाढ झालेली दिसून आली. त्यांच्या एका उसाच्या रोपाचे वजन सरासरी चार किलोपर्यंत भरल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान तेज agrotec कंपनीचे चेअरमन सुभाष शिंगटे व व्यवस्थापकीय संचालक यशवंत घाडगे यांनी सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांचीच मुले असल्याने शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतीचा पोत कायम राखण्यासाठीची औषधे व एकूण पिकसल्ला कंपनीच्या अंतर्गत तयार करण्यात आला. आज शिरूर तालुक्यात हजारो शेतकरी आमच्याशी जोडलेले आहेत. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविणे व उत्पादन खर्च कमी करण्यावर आमचा भर असून त्यादृष्टीने आमचा प्रयत्न कायम सुरू आहे. पठाण यांच्यापूर्वीही एका एकरात १३१ टनापर्यंत उसाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे.